- सुकृत खांडेकर राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून आंदोलन चालू होतं. हिंदी आणि इंग्रजी मीडिया आंदोलनाविरोधात आग ओकत होता. राज ठाकरे देश तोडायला निघाले आहेत, असा प्रचार अमराठी मीडियातून चालू होता. राज यांचं आंदोलन चूक की बरोबर या प्रश्नावर आपण कोणत्या चष्म्यातून बघू तसं उत्तर मिळेल. राज यांना मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठी लोकांची फार मोठी सहानुभूती मिळाली. लालूप्रसाद, अमरसिंग, रामविलास पासवान, नीतिशकुमार आदींच्या थयथयाटानंतर केंद सरकारच्या दबावापुढे राज्य सरकारने मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या राज यांना अटक करून तुरुंगात पाठवलं. भारंभार केसेस घातल्या. त्यांच्या कार्यर्कत्यांना हुडकून बदडून काढल्याच्याही घटना घडल्या. राज यांना भाषणावर, प्रेस कॉन्फरन्सवर बंदी घातली. मराठी माणसासाठी ब्र काढाल तर याद राखा, असा इंगा सरकारने मनसेला दाखवला. हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकतं,
असं मनात आलं.
राज यांनी मुंबईवर आदळणाऱ्या हिंदी विशेषत: बिहारी लोंढ्याच्या विरोधात आंंदोलन का केलं, ही पाळी त्यांच्यावर का आली, मराठी मुलांना महाराष्ट्रात रेल्वे किंवा केंद सरकारच्या वा सार्वजनिक उपक्रमात नोकऱ्या का मिळत नाहीत, महाराष्ट्राच्या मराठी राजधानीत परप्रांतीयांचीच जास्त भरती का होते, या प्रश्नांचा सरकारने कधी गंभीरपणे मागोवा घेतला नाही? असो. राज यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील मराठी माणसाची घुसमट बाहेर पडली आणि सत्तेवरील मराठी राज्यकतेर्च मराठी आंदोलकांना कसे बदडतात, हे साऱ्या देशाला दिसून आलं.
मराठीचा मुद्दा निघाला, की मुंबईतील मराठी माणूस अस्वस्थ होतो. राज्यातील अन्य भागातील मराठी लोकांपेक्षा मुंबई, ठाणे, रायगड, कोकणातील मराठी माणसाच्या वेदना वेगळ्या आहेत. मराठीचा मुद्दा खरं तर राजकारणाच्या पलीकडचा आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर दुसरा कोणी मराठी माणूस भेटला की आनंद होतो, हे त्याचंच प्रतीक आहे. आपला माणूस ही त्यामागची भावना असते.
पंधरा दिवसांपूर्वीच डेहराडूनला गेलो होतो. डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी. उत्तराखंड राज्याच्या निमिर्तीला नऊ वर्षं पूर्ण झाली म्हणून डेहराडूनमधे आणि अन्य शहरांत अनेक कार्यक्रम आठवभडाभर साजरे केले जात होते. आठवडाभराच्या मुक्कामात तिथली सारी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रं काळजीपूर्वक वाचत होतो, तिथल्या वृत्तपत्रांत महाराष्ट्राची बातमी येणार नाही हे समजू शकत होतो. पण राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या विरोधात राष्ट्रीय एकात्मतेचे डोस पाजणारे लेख रोज कुठे ना कुठे तरी वाचायला मिळत होते. एक दिवस डेहराडून प्रेस क्लबमधे गेलो. मुंबईहून आलेलो पत्रकार म्हणून ओळख करून दिली. प्रेस क्लबचे अनेक पदाधिकारी भेटले. पहिल्याच भेटीत एक जण म्हणाला : आमचे खूप लोक मुंबईत आहेत.(प्रत्येक राज्यातील लोक असं अभिमानाने सांगत असतात.) आमचे म्हणजे उत्तराखंडी. उत्तराखंड हा पूवीर् उत्तर प्रदेशचा भाग होता. नऊ जिल्हे वेगळे काढून वाजपेयी सरकारच्या काळात नवं राज्य निर्माण करण्यात आलं. डेहराडूनमधून ३०-३५ लहान-मोठी दैनिकं प्रसिद्ध होतात. बहुतेक बड्या हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांच्या तिथे स्वतंत्र आवृत्त्या आहेत. प्रेस क्लबचे दोनशे पत्रकार सदस्य आहेत. मुद्दाम त्यांची यादी घेतली. त्यात एकही मराठी नाव मला आढळलं नाही. राज्य सरकारच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचं नाव, टेलिफोन असणारी डिरेक्टरी मिळवली, त्यातही मराठी नाव सापडलं नाही. इण्डो-तिबेटियन पोलिस फोर्सच्या प्रमुखपदी मराठी नाव आढळलं. मोठ्या उत्सुकतेने त्यांना ऑफिसमधे फोन लावला. एगेंज मिळत होता. शेवटी घरी फोन केला. पलीकडून पंजाबीतून विचारणा झाली. मराठी अधिकाऱ्याचं नाव विचारताच, त्यांची दोन महिन्यांपूर्वी दिल्लीला बदली झाल्याचं सांगण्यात आलं. डेहराडूनमधे बहुतेक सर्व टीव्ही चॅनल्सची युनिट्स आहेत, पण मराठी नाव कुठे सापडलं नाही. दूरदर्शनवरच्या यादीवर एक मराठी नाव सापडलं, मला खूप आनंद झाला. त्या नावापुढे मोबाइल नंबरही लिहिलेला होता, लगेच तो नंबर फिरवला आणि मराठी आवाज ऐकू आला. आपला माणूस भेटल्याचा आनंद झाला. दोन महिन्यापूर्वीच मुंबईहून त्यांची डेहराडूनला बदली झाली होती.
डेहराडूनमधील इंडियन मिलिटरी अॅकॅडमीला (आयएमए) भेट देण्याचा योग आला. आयएमएमधे पुण्यात एनडीए पास झालेले कॅडेट्स वर्षभर प्रशिक्षण घेतात. आयएमएची भेट कधीच विसरता येणार नाही. आर्मीची शिस्त, कवायती, प्रात्यक्षिकं, युद्धाचं प्रशिक्षण, शिक्षण आणि संशोधन असं खूप काही तिथं आहे. तिथला पदवीदान समारोह हॉल बघण्यासाखा आहे. ब्रिटिश काळापासूनचा लष्कराचा इतिहास तिथे पाहायला मिळतो. शंभर वर्षापूर्वीचं सैन्याचे गणवेश, शस्त्रांमधे झालेले बदल, जुन्या-नव्या बंदुका, भाले-तलवारींपासून आधुनिक बंदुकांपर्यंत झालेले बदल, कवायतीच्या पद्धती, मेजर जनरल्स आणि त्यावरील वरिष्ठ अधिकारी, लष्करप्रमुख यांचे फोटो हे सर्व तिथे आहेत. ते पाहताना छाती अभिमानाने भरून येते. तिथे लष्करप्रमुखांची यादी आहे, राष्ट्रपती सन्मान, परमवीर चक्र, विशिष्ठ सेवा आणि सेना मेडल्स मिळविलेल्या अधिकाऱ्यांचे फोटो आणि नावं आहेत. पण मराठी नावासाठी शोधाशोध करावी लागते.
डेहराडूनहून पहाटेच्या जनशताब्दी एक्स्प्रेसने नवी दिल्लीकडे जाताना एसी डब्यांवर बाहेर लावलेला रिझवेर्शन चार्ट बघितला. त्यातही मराठी नाव नाही. ट्रेनमध्ये कण्डक्टर, चेकर मराठी नाही, वेटरही मराठी नाही. वाटेत स्टेशनवर कुठेही मराठी विक्रेते, फेरीवाले नाहीत.
मुंबईत परतलो, परप्रांतीयांच्या गदीर्त सापडलेल्या मराठी लोकांत पुन्हा एकदा मिसळून गेलो. मुंबईवर २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस आणि अधिकारी सारे मराठीच होते. दिल्ली-मुंबईत राज्यर्कत्यांचे बळी पडले तेही मराठीच होते. पण लॉर्ड मेघनाद देसाईंसारख्या विद्वानांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची घाई झाली आहे, मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' चांगलं होतं, असं ते सांगू लागले आहेत. मराठी माणसाचं मन ठाऊक नसलेल्यांची मुंबईत गदीर् झाली आहे आणि मंत्रालयातील खुचीर् टिकवण्यासाठी राज्यर्कत्यांनाही मराठी माणसापेक्षा या गदीर्ची जास्त काळजी आहे.
म्हणूनच मराठी मन नेहमीच आपला माणूस शोधत असतं. |
|