Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक



कल्याणहून एक रस्ता मुरबाड, टोकवाडी, माळशेज घाट करत नगरला जातो. कल्याणहून साधारण चाळीस-पंचेचाळीस कि.मी.वरचं सरळगाव सोडलं की सगळा मुलुख बदलतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी भाताची शेतं, त्यात विसावलेली घरं हे दृश्य जाऊन निर्जन जंगल दिसू लागतं. बाहेरची विराटता आणि शांतता आपल्याला सगळं विसरायला लावून वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव करून देते. त्यात उजवीकडे दूरवर दिसत असलेल्या सह्यादीच्या बेलाग डोंगररांगा आणि त्यातले काळेकभिन्न कडे आपल्याला होत असलेली जाणीव अधिक ठळक करत जातात.

हा आहे माळशेज घाटाच्या पायथ्याचा वैशाखरे, मोरोशी, सावणेर्चा ठाणे जिल्ह्यातला आदिवासी प्रदेश. या सगळ्यात उजवीकडच्या भल्यामोठ्या डोंगररांगेतून बाहेर आलेला एक मोठा कडा आपली नजर सतत वेधत असतो. विशेष म्हणजे खूप दूर असूनही त्याचं अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं. त्याचं हे अस्तित्व नुसतं आकारामुळे नाही तर त्याच्या कित्येक वर्षांच्या अफाट कर्तृत्वामुळे आहे. हा कडा आहे 'नानाचा अंगठा' आणि त्याच्या बगलेतला त्यावेळच्या दख्खन पठारावरचा एक प्रमुख व्यापारीमार्ग 'नाणेघाट' आणि या दोघांच्याही मागे असलेला त्यांचा रक्षक 'जीवनधन' हा किल्ला.

आज या विराट आणि वैराण परिसराला आधुनिक सोयींचा पुसटसाही स्पर्श झाला नसला तरी फार प्राचीन काळापासून या परिसरात मोठ्या उलाढाली होत असल्यामुळे इथे मोठी सुबत्ता नांदत होती. सातवाहनांच्या आणि महाराजांच्या काळातही त्यावेळी जुन्नर ही दख्खनमधली मोठी बाजारपेठ होती. तर सोपारा आणि कल्याण ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय बंदरं होती. या बंदरावरून उतरलेला सगळा माल नाणेघाटामागेर् देशावरच्या जुन्नरला जात असे. याची साक्ष पटवणाऱ्या अनेक खुणा आज भग्नावस्थेत असल्या तरी नाणेघाटाच्या तोंडावर एक माणूस आत बसू शकेल असा दगडी रांजण आजही इथे आहे. त्याकाळी यात रोजची जकात जमा होत असे.

नाणेघाटाचा ट्रेक हा डोंगरभटक्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. मुरबाड-सरळगावच्या पुढे 'टोकावडे' हे या मार्गावरचं थोडंस मोठं गाव आहे. मात्र नाणेघाटात जाणारी पायवाट याच रस्त्यावरुन तीनेक कि.मी. पुढे गेल्यावर उजवीकडे आहे. याची खूण म्हणजे इथे उजवीकडेच 'ओतुर ४५' असा मैलाचा दगड आहे. त्यामुळे बसचं तिकिट वैशाखऱ्याच्या पुढच्या स्टॉपचं म्हणजे मोरोशीचं काढावं. टोकावड्याला बस कण्डक्टरला या जागी बस थांबवण्याची खास विनंती केली की आपली ही तीन कि.मी.ची चाल वाचते.

इथून उजवीकडे तिरकं बघितलं की नानाचा अंगठा समोर दिसतो आणि त्याच्या बाजूला दोन मोठे हाय टेंशन वायरचे टॉवर दिसतात. या टॉवरमधून इलेक्ट्रिक वायर्स खालच्या दरीत आलेल्या दिसतात. वर जाणारी वाट ही या सतत या वायर्सच्या खालून जाते. त्यामुळे उतरल्यावर पहिल्यांदा आपली दिशा निश्चित करण्यासाठी या टॉवर्सचा अंदाज घेतला पाहिजे. कारण वर जाणाऱ्या या वाटेव्यतिरिक्त सगळीकडे ताशीव कडे असल्याने वर जायला दुसरी वाट नाही.

या वाटेवर आल्यानंतर अगदी थोड्याच वेळात दोन वाटा आहेत. यातली एक मळलेली वाट डावीकडे जाते व दुसरी थोडीशी खाली उतरते. इथे मात्र सावध राहून खाली उतरणारी वाट पकडली की आपण सरळ नाणेघाटात पोहोचतो. सगळा रस्ता एकदम रूंद असला तरी दगडधोंड्यांचा आहे. रात्री ट्रेक करायचा असेल तर प्रत्येकाजवळ दोन अधिक सेल्ससह उत्तम विजेरी हवी. रमतगमत वरच्या गुहेपर्यंत जायला अडीच-तीन तास लागतात. बसमधून उतरल्यावर वर पोहोचेपर्यंत वाटेत पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. पावसाळ्यात मात्र या मार्गावर प्रचंड पाणी वाहत असतं. कोणीही कधीही घसरू शकतो. त्यामुळे सोबत प्रथमोपचाराचं साहित्य असणं जरुरी आहे.

याच नानाच्या अंगठ्याच्या कड्यात मध्यभागी एक मोठी चौकोनी गुहा आहे. यात सहज पंचवीस एकजण मुक्काम करु शकतात. गुहेच्या बाजूलाच पाण्याची पाच-सात टाकं आहेत. इथे बाराही महिने चांगलाच गारवा असतो. त्यात गुहेची जमीन म्हणजे कातळ असल्याने खाली अंथरायला कॅरीमॅट आणि पांघरायला स्लिपिंग बॅग असायला हवी. ही गुहा निर्जन असल्याने मुक्कामी असेल तर बरोबर पातेली, शिधा आणि मेणबत्त्याही हव्यात. मात्र जीवधनचा ट्रेक करायचा असेल तर सगळं सामान सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे.

नाणेघाटाच्या डोंगरमाथ्याहून उजवीकडे एक-दीड कि.मी.वर 'घटघर' हे छोटंसं खेडं आहे. इथून उजवीकडे साधारण पाऊणेक तास डोंगर चढल्यावर आपण 'जीवधन' (समुदसपाटीपासून ३७५४ फूट) या किल्ल्यावर पोचतो. वर डोंगरात पाण्याची टाकी आणि काही डोंगरात खोदलेल्या खोल्या आहेत. डोंगराच्या एका कडेवरून खालच्या बाजूला 'खडा पारशी' किंवा स्थानिक भाषेत 'वांदरलिंगी' नावाने ओळखला जाणारा प्रचंड सुळका आहे. घाटघरहून वरती जाणारी वाट काही ठिकाणी निमुळती आहे. जीवधनवरून उत्तरेला कळसूबाई, दक्षिणेला भीमाशंकरची पर्वतरांग, ईशान्येला हरिश्चंदगड, वायव्येला माहुलीचा किल्ला तर खालचं नाणेघाटाचं पठार, नानाचा अंगठा असा अतिशय भव्य आणि विराट देखावा दिसतो.

काहीजण याचबरोबर जुन्नरकडे असलेले चावंड, हडसर आणि शेवटी शिवनेरी असाही ट्रेक करतात. घाटघरहून जुन्नरला जायला दिवसातून ठराविक वेळी बसेस आहेत. ज्याने कोणी एकदा का नाणेघटचा हा भन्नाट ट्रेक आणि तिथल्या गुहेत मुक्काम केला की त्याचे सह्यादीतल्या या डोंगराशी ऋणानुबंध होतात. नाणेघाटची गुहा त्याला वारंवार बोलावत राहते. काही जागा असतातचं अशा ओढाळ आणि सह्यादीत तर अशा जागा अगणित आहेत.

AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad

updation in progress!

our blogs

Loading...

apali prerana