आपल्या आयुष्यात करिअर आणि शिक्षण यांचा संबंध असतो. अनेक जण शिक्षण घेतात, शाळा, कॉलेजच्या प्रगतीपुस्तकात ते चमक तात. करिअर करताना मात्र वेगळ्याच वाटेने जातात. तिथेही स्वत:च स्थान निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला किती महत्त्व आहे, हे सांगणारा कॉलम 'मेरिट लिस्ट'.
.......
निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे. बारावीत मेरिट लिस्टमधे आलेल्या निशिगंधाने पीएचडी पूर्ण केली आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, याविषयी सांगतेय स्वत: निशिगंधा वाड.
....
कामाचे व्याप, एकामागोमाग आलेल्या जबाबदाऱ्या, त्यातून मिळणारे असंख्य अनुभव... हे सगळं अनुभवत असताना आयुष्याला नकळत वेगाची सवय होऊन गेली. आपल्याच पाऊलखुणा कधी मागे पडल्या ते कळलंही नाही.
मी डॉक्टर निशिगंधा वाड, अशी ओळख करून देताना आज खरंच खूप बरं वाटतं. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आव्हानं स्वीकारण्यातला आणि ती पूर्ण करण्यातला आनंद काय असतो ते पदवीने मला शिकवलं. खरं म्हणजे मी आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावले होते. संसार, करिअर या महत्त्वाच्या टप्प्यांनी लय पकडली होती. पण तरीही मला डॉक्टरेट मिळवायचीच होती.
आमच्या घरावर सरस्वतीचा पहिल्यापासूनच वरदहस्त. माझी आई शिक्षिका, थोरली बहीण प्राजक्ता अतिशय आदर्श विद्याथीर्नी. प्रचंड बुद्धिमान, गुणी... पण मी घरातलं आगाऊ शेंडेफळ म्हणून ओळखले जायचे. शाळेत असताना जरी वर्गात वरचा नंबर येत असला तरी नाटक आणि अभ्यास असा डोलारा मी सावरत असायचे. आमचे सगळेच नातेवाईक उच्चशिक्षित. माझा कलाक्षेत्राकडचा ओघ पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. पण प्रत्येकवेळी माझी आई खंबीरपणे माझ्यामागे उभी राहिली.
घरच्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण माझ्या अभ्यासात कुठेही खंड पडणार नाही ना याची काळजीही घेतली. त्यांच्या या पाठबळामुळे दहावीत पहिल्या पन्नासात माझं नाव झळकलं. रिझल्टच्या दिवशी मी दिनानाथ नाट्यगृहात 'मोरूची मावशी'चा प्रयोग करत होते. रिझल्टची बातमी आली तेव्हा सगळ्या कलाकारांनी मला पेन, कम्पासपेटी, गोष्टीचं पुस्तक अशा भेटी देऊन आनंद साजरा केला होता. त्या छोट्या सोहळ्याचा आनंद आजही तसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा आहे.
८७ मधे मी बारावी झाले. मी रूपारेल कॉलेजमधे आर्ट्सला शिकत होते. अभिनयक्षेत्रातला माझा ओढा पाहून प्रिन्सिपल प्रधान मला शक्य तितकी मदत करायचे. मी तिसरा भाषा विषय म्हणून हौसेने जर्मन घेतलं होतं. पण ट्युशन्ससाठी वेळ नव्हता. मुलुंड ते दादर दरम्यान लोकल प्रवासात जर्मन विषयाची डिक्शनरी पाठ करायची सवय लावून घेतली. त्या बळावर पेपर्स लिहिले. बारावीत मी मेरीटमधे तिसरी आले तेव्हा माझ्यापेक्षा शिक्षक आणि घरातल्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्यांच्या आनंदानेच मला शिक्षणातल्या पुढच्या टप्प्याचे वेध लावले आणि बाहेरच्या जगाचा अनुभव घेत असताना शिक्षणाबद्दलची ओढही उत्तरोत्तर वाढत गेली.
ग्रॅज्युएशननंतर रुईयातून थिसीस लिहित होते. याचवेळी माझ्या मुलीचा जन्म झाला. आयुष्यातल्या या नव्या पर्वामुळे माझ्या शिक्षणात खंड येणार या गोष्टीने मी अस्वस्थ झाले. त्यावेळी माझ्या गाईड, घरचे खंबीरपणे माझ्यामागे उभे राहिले. मीही पुन्हा निश्चय केला आणि या मेहनतीचं फळ मिळालं. वाड घराण्याची शेंडेफळ निशिगंधा, डॉक्टर निशिगंधा वाड झाले.
कलाक्षेत्रात करिअर करूनही डॉक्टरेट मिळवायची ओढ किंवा आज जे काही कमावलंय त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. परमेश्वरांनी आपल्याला जे दिलंय त्यात स्वत:च्या मेहनतीने आपण अठरा टक्क्यांनी वाढ करू शकतो. पण आईवडिल यांचे संस्कार आयुष्याला शंभर टक्के आकार देतात, हे मी अनुभवातून सांगतेय.
माझ्या आईचं एक वाक्य आहे, संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रुजली असली की कुठल्याही आकाशात आपल्या पंखांचं बळ आजमवायचं भय नको.... बालपणापासून ते आजच्या या क्षणापर्यंत हे पाठबळ माझ्यासोबत आहे. |
|