सुट्टी संपली! शाळेच्या कोऱ्या करकरीत वह्या-पुस्तकांचा खास वास जाणवायला लागलाय! नवा वर्ग, नवे मित्र, नवे शिक्षक... सगळ्याची उत्सुकता मुलांना शाळेकडे खेचू पाहाते. पण त्याच वेळेस 'खूप मजा केलीत! उनाडक्या केल्यात! आता सगळं बंद! मुकाट अभ्यासाला लागा.' असे फर्मान वेगवेगळ्या सुरात (पण मजकूर सारखाच!) आई-वडिलांकडून सोडलं जातं! आणि शाळा सुरू व्हायच्या आधीच, विनाकारणच शाळेचा - अभ्यासाचा 'ताण' निर्माण होतो.
साऱ्या सुटीभर वेगवेगळे संस्कार वर्ग, छंद वर्ग, कला वर्ग, पोहोणे-स्केटिंग-क्रिकेट असे खेळांचे क्लासेस, सहली, ट्रेक असल्या धमाल वेळापत्रकात मनापासून गुंगलेली मुले एकदम टॉप गियरमधून शाळेच्या रिव्हर्स गियर मधे पडतात! 'सुटी म्हणजे आनंद, सुप्त गुणांचा विकास' आणि 'शाळा म्हणजे फक्त अभ्यास आणि जीवघेणी स्पर्धा' अशा दोन हवाबंद कप्प्यात मुलांच्या सुंदर (?) बालपणाचे तुकडे पडतात.'
शाळेतील भाषा, शास्त्र, गणित, तर्क असा बलाढ्य विषयांची हाताळणी, आपल्या मुलांचा डावा मेंदू अगदी फुलस्पीड मधे करीत असतो. (कारण तेच त्याचे काम आहे) परंतु संगीत, चित्रकला, कल्पना, भावना, सामाजिक जाणीवा आणि खासकरून हस्तकौशल्य व सृजनशीलता सांभाळणारा उजवा मेंदू न वापरल्याने चक्क गंजू लागतो. थोडक्यात, दोन बैलांच्या गाडीचा एक बैल कामाअभावी सुस्तावतो तर दुसरा बैल प्रचंड कामाने थकून जातो. पर्यायाने मुले थोड्याच वेळात दमतात, मेंदूची कार्यप्रणाली मंद होते. एकाग्रता कमी होते. अस्थिरता व चिडचिड निर्माण होते!
खरं तर हस्तकला, चित्रकला, प्रयोग, निसर्ग निरीक्षण, छोटे मोठे ट्रेक, भ्रमंती, गप्पा-गाणी-गोष्टी, नाटक, नृत्य हे संगळं फक्त सुटीपुरते मर्यादित न राहाता, शिबिर-संस्कारवर्ग असल्या चौकटीत न अडकता, रोजच्या शाळेबरोबरच चालू राहिले पाहिजेत. हे सगळे उजव्या मेंदूचे उपक्रम शाळेतील अभ्यासाच्या ताणाला एक झकास "उतारा' मिळवून देतात. संगणकाच्या भाषेत 'ड्युएल प्रोसेसर' मेंदू जास्त जोमाने, न थकता काम करू शकतो. आपण सर्वजण दर आठवड्याला रविवारची (काही ठिकाणी शनिवार सुद्धा) हक्लाची सुट्टी घेतो. मग केवळ शरीरालाच नव्हे तर आपल्या मेंदूलाही ती का नको?
पण ही हक्काची सुट्टी बहुतेक मुले टाइमपास करण्यात घालवतात. त्यात अर्थात टी. व्ही. आणि संगणक (पुन्हा डाव्या मेंदूचेच काम) मुख्य वेळ खातात. उरलेला वेळ उगाच भटकण्यात व हॉटेलिंग करण्यात जातो. जरा जागरुक पालक असले, तर मुलांना क्लासेस मधे अडकविण्यात येते. परंतु मुलाने स्वतःहून काही केले आहे. नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत हे घडतच नाही. मग "चमच्याने भरवले' तरच खायची सवय लागते. हे टाळण्यासाठी, मुलांना शेजारी बसवून वेगवेगळी कौशल्ये शिकवावी लागतात. कारण कौशल्य नसेल तर निव्वळ माहितीचा विशेष उपयोग होत नसतो. कौशल्य असेल तर मग त्यात शास्त्रीय संकल्पना आणि कलात्मक सृजनशीलता एका मेळाने येतात. ही प्रक्रिया केवळ सुटीपुरती मर्यादित नसून निरंतर असायला हवी.
ही निरंतर प्रक्रिया वर्षभर चालू ठेवण्याचे काम गेली वीस वर्षे श्री. माधव खरे आणि सौ. सुनीता खरे शास्त्रवाहिनीच्या माध्यमातून करत आहेत. हस्तकौशल्ये आणि मूलभूत शास्त्रीय माहितीचा एकत्रित वापर करून (थोडक्यात, उजव्या व डाव्या मेंदूचा एकत्र वापर) सुंदर व उपयुक्त प्रकल्प निर्माण करण्याचे तंत्र शास्त्रवाहिनी मुलांपर्यंत सहजपणे पोहोचविते. त्यातून मुलांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण त्यांच्यात स्वयंशिक्षणाची आवड निर्माण होते हे विशेष महत्त्वाचे!
- डॉ. सुनील सुरेश गोडबोले
shastravahini@rediffmail.com
(डॉ. गोडबोले पुण्यातील बालरोगतज्ज्ञ आहेत. बालमानसशास्त्रावर त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. 'आई मी काय खाऊ...?', 'पोरी जरा जपून', 'बालपण फुलवताना' ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.)

original at - http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=1a47a9df-9004-4849-8ca9-427a9296dd1b&SID=727