मुलगाच मुलीच्या घरी लग्नानंतर मुलगाच मुलीच्या घरी राहायला आला तर? म्हणजे घरजावई म्हणून नव्हे, तर समाजातली- सर्व घरांमधली रीत म्हणून. मुलीचं घर, तिची माणसं, तिचं आयुष्य आहे तसंच पुढे चालू राहणार. किती छान कल्पना वाटते ना?
गंमत म्हणजे ही काही नुसतीच कल्पना नाही तर प्रत्यक्ष तसं घडतंही आहे.
नुकतीच मी 'मेघालय'मध्ये जाऊन आले. नुसते पर्यटक म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित सगळं अनुभवायला नाही मिळणार. पण मला 'जोवाई' या गावामध्ये तिथल्या कुटुंबात राहता आलं. आई- तिची मुलगी आणि मुलीची मुलगी असं एकत्र नांदतं घर मी अनुभवलं.
नवराच लग्नाननंतर मुलीकडे राहायला येतो. तीन-चार बहिणी असतील तर आईच्या घराशेजारी घर बांधून त्या राहतात आणि सर्वांत धाकटी मुलगी तिच्या नवऱ्यासह आई-वडिलांकडेच राहते.
याला मातृसत्ताक पद्धती असं सरसकट म्हणू नका, ही आहे 'मातृवारस' पद्धत. म्हणजे मातृ'सत्ता' नाही पण वारसा मात्र आईकडून मुलीकडे जातो. कुटुंबप्रमुख नवराच असतो पण उत्सव, सण, धार्मिक विधी यामध्ये महत्त्व असतं घरच्या स्त्रीला आणि तिच्या मामाला किंवा भावाला. कसलं छान वाटत होतं त्या कुटुंबात राहताना.
मोठे सण - समारंभ वगळता सासू-सुनेचा संबंधच नाही. सून राहणार आपल्या आईजवळ आणि सासू राहणार तिच्या मुलीजवळ. म्हणजे भांड्याला भांडं लागायचा प्रश्नच नाही. भांडण नाही, इगो क्लॅश नाही. नवऱ्याची दोन्हीकडून होणारी रस्सीखेच नाही.
या सगळ्यावर कडी करणारी आणखी एक गोष्ट. ती म्हणजे नवरा राहतो बायकोकडे आणि जेवायला मात्र जातो आपल्या आईकडे. म्हणजे नवऱ्यासाठी स्वयंपाक करायचीही भानगड नाही. 'बाई आणि तिची मुलं' हेच नातं केंद्रस्थानी.
आदिवासी कुटुंबामधून आलेली ही परंपरा. पण आज ही कुटुंबं चांगली सुस्थितीमध्ये आहेत.शिकलेली आहेत. आम्ही राहात होतो त्या कुटुंबामधली मुख्य स्त्री कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापक होती. अस्खलित इंग्रजी बोलत होती.
बदलत्या काळानुसार मातृवारस पद्धतीत काही ठिकाणी बदल होत आहेत. पण मेघालयात प्रामुख्याने ही पद्धत टिकून आहे.
मैत्रिणींनो, मग वाटतंय ना की महाराष्ट्रात फुकट इतकी वर्षं काढली म्हणून? की इथे आणायचा ठरवताय मेघालयातला मुलगा लग्न करून?
original at - http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=a24dafcc-b2f8-40f1-98ce-30efba4a908d&SID=742